वाङ्मयाविषयी
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान संत एकनाथांना मिळतो. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. संत एकनाथांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपली लेखणी झिजवली. संस्कृतातील ज्ञान मराठीत यावे यासाठी प्रयत्न केले. संस्कृत भाषेऐवजी मराठी भाषेचा सहेतुक आग्रह धरला. भागवत ग्रंथावर मराठीतून टीका लिहिली.
संत एकनाथी भागवत, हे वारकरी संप्रदायात महत्त्वाचे मानले जाते. यासह भावार्थ रामायण, अभंगरचना, भारूड अशी विविधतापूर्ण रचना त्यांनी केली आहे. त्यांची आख्यानपर रचना , ‘रुक्मिणीस्वयंवर' ही मनाला अतिशय भावते. भारूड हा प्रकार संत एकनाथांनी मराठी भाषेला दिला.
उत्तर काशीतील विद्वान पंडितांच्या नि लाखो श्रोत्यांच्या पुढाकारानं एकनाथी भागवत ग्रंथाची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रस्त्या रस्त्यावर काशीकरांनी पैठणच्या नाथांच्या भागवत ग्रंथावर प्रेमपूर्वक पुष्पवृष्टी केली. नाथ पैठण ला पोहोचल्यावर पैठण नगरीतही भव्य अशी ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली.