भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- 36211720207 आय. एफ. एस. सी.:- SBIN0003796(स्टेट बँक ऑफ इंडिया) अंतर्गत आयकरात वजावट - Tech/80G/294/2017-18/6919

॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥

संत एकनाथ महाराज जीवनगाथा

जीवनगाथा

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आणि कवी होते. ‘नाथ’ या नावाने सर्वपरिचित. नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व आईचे नाव रुक्मिणी होते.

दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होते. संत एकनाथ यांना बालपणापासूनच अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.

वयाच्या १२ व्या वर्षी नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे जनार्दन स्वामी किल्लेदार म्हणुन होते. ते दत्तोपासक होते. नाथांनी त्यांना पाहताच गुरू मानून मनोमन सेवा केली. नाथांची सेवा पाहुन स्वामींनी त्यानां शिष्य म्हणुन स्वीकारले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. निस्सिम सेवेने नाथ दत्‍तात्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहुन शुलिभंजन पर्वतावर त्यांना पहिले दत्‍तदर्शन स्वामींनी घडविले.

पुढे तीर्थयात्रा करुन नाथ पैठण नगरीत पोचले. तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव. त्यांना तीन अपत्ये झाली. हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदा व गंगा या नावाच्या दोन मुली. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून (गोदा) नातू. नाथांचा प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही फुलू लागले. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने त्यांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. पण यावरुन त्यांना अनेकांनी विरोध केला, अनेक प्रकारे नाथांना त्रास दिला परंतु तरीही नाथांनी त्यांचा कधीही तिरस्कार केला नाही. परंतु त्यास न जुमानता लोकोद्धारासाठी त्यांनी लोकांच्याच भाषेत लोकांना परमार्थमार्गास लावले. देवाचे स्मरण घेण्याचा अधिकार स्त्री शूद्र आदी सर्वांना आहे असे वारंवार सांगितले.

आळंदीस जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. नाथांनी भारूड, गवळणी, अभंगरचना, जोगवा, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती व प्रबोधन केले तसेच त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १६००) या दिवशी संत एकनाथ समाधीस्थ झाले. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित यांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

कार्य

संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते, असे म्हटले जाते. विद्या आणि तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्यांच्या कल्याणाचे कार्य संत एकनाथांनी केले. त्यांच्या लोकोत्तर कार्याने या पैठण नगरीची कीर्ती सर्वदूर पसरली. संत एकनाथांनी पैठणला भक्तिभावाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

संत एकनाथांचा जीवनपट

  • जन्म व जन्मस्थळ : शके १४५५ (इ.स.१५३३), पैठण

  • वंश व मूळपुरूष : सूर्यवंशी, भास्करपंत कुलकर्णी म्हैशाळ. पणजोबा - संत भानुदास महाराज

  • गुरूगृही : शके १४६७ ते १४७७, देवगिरी गडावर, किल्लेदार संत जनार्दन स्वामीकडे

  • साधना व दत्तदर्शन : शके १४७५, शूलभंजनपर्वतावर, गुरूपदेश : फा. व. ६ शके १४७५

  • सद्गुरूसह तीर्थयात्रा : शके १४७७, ग्रंथरचना शुभारंभ चतुःश्लोकी भागवत (मराठी ओव्या- १०३६)

  • गृहस्थाश्रम (विवाह) : शके १४८१ तीर्थयात्रेहून पैठणला परतल्यावर गिरीजाबाईशी विवाह, नाथ 'शांतिब्रह्म', पत्नी 'शांतिसरिता'

  • अपत्ये : कन्या - गंगा व गोदा, पुत्र – हरिपंडित

  • वाङ्मय : प्रमुख ग्रंथ - रूक्मिणी स्वयंवर - शके १४९३, एकनाथी भागवत - शके १४९५, भावार्थ रामायण (पूर्वार्ध) - शके १५२१

  • स्फुट रचना : तत्त्वज्ञानपर ग्रंथ, अभंग, पद, गवळणी, भारूड, चरित्रं, आख्यान,स्तोत्र, आरत्या आदि एकूण रचना पाऊण लाख.

  • ग्रंथ विशेष : उत्तर काशी रुक्मिणी स्वयंवर, भागवत रचना पूर्ण. नाथभागवत- मराठी पहिल्या ग्रंथाची काशीत हत्तीवरून मिरवणूक - शके १४९५

  • युगसंजीवक कार्य : शके १५०५ - संत ज्ञानेश्वर समाधीचा जीर्णोद्धार (स्वप्नदृष्टांतानुसार). शके १५०६ ज्ञानेश्वरीचे प्रतशुद्धिकरण (मराठीतील पहिले संपादक)

  • सर्वसमभाव : कडक उन्हात पाय पोळणाऱ्या अस्पृश्याचे मूल कडेवर घेणे, तहानेनं तडफडणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजणे, दारी आलेल्या भुकेल्यांना श्राद्धान्न वाढणे आदि.

  • विजयी पांडुरंग : कर्नाटकातील सावकाराने स्वप्नदृष्टांतानुसार पंचधातुची दिलेली पांडुरंगाची मूर्ती.

  • लोकजागर: भजन, भारूड, कीर्तन, प्रवचन, लोकरंजनातून लोक प्रबोधन.

  • भक्तिप्रसार : भागवतधर्माला बळकटी, नवविधा भक्तिप्रसार, अद्वैत भक्तिसूत्र.

  • एकनाथषष्ठी : फा. व. ६ नाथसमाधीदिनी प्रतिवर्षी पैठणचा एकनाथष्ठी महोत्सव परंपरा.